ती तिबेटी आजी

ती तिबेटी आजी माझ्या नजरेला पडली ती त्या सुवर्ण मंदिरातून बाहेर पडता पडता. एक रमणीय आणि प्रसन्न वास्तु आणि परिसर बघायला मिळाल्याच्या आनंदावर अलगद तरंगत असतांनाच समोर, मंदिराच्या प्रांगणातील दुकानाशेजारी एका प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसलेल्या त्या तिबेटी म्हातारीकडे माझं सहज लक्ष गेलं. तिचं डोकं शेजारच्या भींतीला टेकलेलं होतं. चेहेऱ्यावर थकले-भागले, उदास, हताश, एकटेपणाचे भाव. काळजात चर्र झालं. अभावितपणॆ कॅमेरा डोळ्य़ांजवळ आला. तेव्हढ्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती एकदम सावरून बसली.

त्या दुकानात शिरलो तरी त्या म्हातारीचाच विचार डोक्यात घोळत होता. आमच्यापैकी कुणालाही काहीही खरेदी करावयाची नव्हती. थोडं विन्डो शॉपिंग थोडं काउण्टर शॉपिंग केल्यासारखं करून मी दुकानाबाहेर पडलो.

दरम्यानच्या वेळात दुकानाबाहेरील दृष्यात अमूलाग्र परिवर्तन झालं होतं.

त्या एकट्या उदास म्हाताऱ्या बाईचं आता एका आजीमध्ये रुपांतर झालं होतं – एकदम अस्सल. एकदम जेन्युइन. झालं असं होतं की, आता तिच्यासमोर एक नातू होता. काही क्षणापूर्वीच त्या नातवानं त्या दुकानातून एक वाद्य घेतलं होतं, आणि त्या वाद्यावरील आपली हुकुमत सिद्ध करून आजीबाईंवर आपली छाप पाडायचा तो प्रयत्न करीत होता. आजीबाईंना परिस्थितीचं आकलन पटकन झालं आणि त्या ताबडतोब त्या लुटुपुटुच्या खेळात त्या नातवाच्या भागीदार झाल्या. केवळ आज्यांच्याच बटव्यात असू शकेल अशी कल्पकताही त्यांच्या मदतील धावून आली. पुराव्यादाखल त्यांच्या हातातील ’वाद्य’ पहा!

तर, तिथे आजी-नातवाचा असा खेळ चालू होता की नातू ते ’वाद्य’ वाजवत होता – आजीला इम्प्रेस करण्यासाठी – आणि आजी त्याला त्याची नक्कल करून चिडवत डिवचत होती. त्या चिडवण्या-डिवचण्यामुळे दुखऊन जाऊन नातू अधिकच त्वेषाने प्रयत्न करीत होता. आणि अशी ही ’देवाण-घेवाण’ अशीच चालू होती. आजूबाजूला जमलेले लोक – त्यात त्या नातवाचे खरेखुरे आजोबाही होते – या खेळाचा मनसोक्त आनंद लुटत होते. त्या आजी-नातवाला मात्र त्याची काही फिकीर नव्हती. ते आपल्या खेळात पूर्णपणे मग्न होते.

मध्यंतरी तिने त्याच्याशी संवादही साधला. त्या दोघांमधलं नातं इतकं तरल होतं की तेथे भाषेची अडचण होत नव्हती – कदाचित तो नातू कानडी बोलत असेल आणी ती आजी तिबेटी बोलत असेल. पण त्यानी काही फरक पडत नव्हता. त्यामुळे संवाद साधण्याला कुठलाही अडथळा येत नव्हता. आव्हाने आणि प्रत्युत्तरे समर्पकपणे दिली जात होती, तिथे गॆरसमज होण्याला वावच नव्हता.

प्रसंग वेगाने उलगडत होता आणि हवामानही बदलत होतं. त्यामुळे मला त्यांची छायाचित्रे काढणं कठीण होऊ लागलं होतं. मी हवामानाला दोष देतो आहे खरा; पण खरं कारण असं आहे, की हळुहळु मी त्या खेळात ओढला जात होतो. हळुहळु दृष्यबदल होत होत मला त्या नातवाच्या जागी मीच आपल्या एका आजीसोबात खेळतांना दिसू लागलो. कॅमेरा खाली आला.

तुम्हाला तुमच्या आज्य़ा आठवतात का? ते त्यांच्याशी खेळणं, त्यांच्याशी भांडून रुसून बसणं, त्यांना सतराशे साठ प्रश्न विचारत विचारत त्यांच्या मागे मागे फिरणं (हातात एक चार सहा मुरमुरे असलेली तिरपी तिरपी होत जाणारी वाटी), तिच्याच हातून आंघोळ करण्याचा, जेवण करण्याचा आणि तिच्याचकडून थोपटून घेत घेत झोपण्याचा हट्ट करणं, ’गोष्ट सांग’ म्हणून तिच्यामागे भुणभुण लावणं (खूप दिवसांनी आठवला हा शब्द!), आणि त्या गोष्टीच्या विश्वात हरवून जाणं. आठवतं नं?

ज्या घरात बाबा शिस्त लावणारे क्र. १ आणि आई शिस्त लावणारे क्र. २ असायचे तिथे आजी-आजोबाच ते काय आपले तारणहार असायचे. त्यातही आजोबा बाजारहाट, हिशेबठिशेब, पूजा, स्तोत्रमंत्रादि पठण, वृत्तपत्र वाचन ई. मध्ये गुंतलेले असल्यामुळे आपल्या वाट्याला कमीच यायचे (शिवाय ते जबरदस्तीने श्लोक शिकवायचे. त्यांनी एक श्लोक शिकवला होता: पुस्तकस्था तु या विद्या, परहस्त गतम् धनम्। कार्यकाले समुत्पन्ने, न सा विद्या, न तत् धनम्॥ मारून मुटकून शिकलेल्या या श्लोकाच्या योगानेच पुढे शाळा-कॉलेजमध्ये अनेकदा भानवर यायला झालं होतं). आईलाही घरकामातून वेळ नसायचा. पण आज्यांचं तसं नसायचं. (जरी त्या स्वयंपाकघरात बरीच कामं करीत असायच्या तरी) त्यांच्याजवळ आमच्यासाठी वेळच वेळ आहे असं आम्हाला वाटायचं  आमचे प्रश्न (आणि इतर बडबड) ऐकून घ्यायची त्यांची तयारी असायची आणि आम्हाला दिवसभरात नाना तऱ्हेनी मदत करायची तयारीही असायची. शिवाय त्यांच्याजवळ आमच्या साऱ्या प्रश्नांना उत्तरं असायची. आणि हे सर्व न चिडता, न रागावता आणि धपाटे न घालता. आणि त्याच्या बदल्यात त्या आम्हाला पत्ताही न लागू देता आमच्याकडून आम्हाला न आवडणाऱ्या पण आमच्यासाठी फायदेशीर असलेल्या अनेक गोष्टी करवून घ्यायच्या. पाढे म्हणणं, ’वायाम’ करणं, घरचा ’आभ्यास’ करणं, भाज्या खाणं, औषध घेणं, घरी कोणी पाहुणे आले (आणि ते नेहमी येतच असायचे) ’शहाण्यासारखं’ वागणं, भावंडांशी मिळुन मिसळून राहणं, लहान भावंडांची (आणि घरच्या गाई-वासरं-कुत्रे ई.ची) काळजी घेणं ही काही उदाहरणं अजूनही पटकन आठवतात.

आज्या आमच्या बेस्ट फ़्रेन्ड्स होत्या, आगदी ज्या क्षणी आम्ही चेहेरे ओळखायला लागलो तेव्हापासून. मला माझ्या आईला ओळखून तिला आपला बेस्ट फ़्रेन्ड म्हणून जाहीर करायला जरा वेळच लागला. वडिलांना समजून घ्यायला, दुर्दैवानी बराच जास्त वेळ लागला.

मला खात्री वाटते की ज्या प्रमाणे माझ्या आज्यांबद्दलच्या आठवणी सुखद आहेत; त्याचप्रमाणे तुमच्याही असतील आणि जसा मी कधीकधी त्यांच्या आठवणींनी व्याकुळ होतो तसं कधी तरी तुम्हालाही होत असेल.

आपण आपल्याला लाभलेला हा अनुभव पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो आहोत की नाही? की त्यांना त्यापासून आपण वंचित ठेवत आहोत?

पहिल्या आणि या शेवटच्या छायचित्रांची तुलना करा. चेहेऱ्यावरचे भाव, चेहेऱ्यावरचा तजेला आणि मूड यांच्यातील फरक ठळकपणे तुमच्या नजरेत भरेल.

केवळ काहीच मिनिटांचा नातू-संपर्क आजीवर ही जादू करतो!

पुन्हा भेटूच!
–रCक.

 

6 Comments

 1. Ravindra Mahadik
  ·

  Best photography & sankalpana

  Reply
 2. Ravindra Mahadik
  ·

  Best Photography & Sankalan

  Reply
 3. संजय शिवाजी सोमदे
  ·

  दोन पिढ्यांचा अलगुज वाजतो, मनी तरंगतो भाव
  चित्रामधील सरगम ऐकला, छान चीतारला स्वभाव

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *