नागपुरातील ट्रॅफिक पार्क मधील खांब

नागपूरमध्ये तीन मोठे बगीचे आहेत: अंबाझरी, तेलंखेडी आणि महाराज बाग. अंबाझरी आणि तेलंखेडी बगिच्यांलगत चांगले मोठे तलावही आहेत. हे तीन्ही बगीचे बरेच पुरातन आहेत.

ज्ञानयोगी स्व. श्रीकांत जिचकार चिल्ड्रन्स पार्क हा त्या मानाने लहान, बिना तलावाचा आणि त्या मानाने अलिकडचा आहे.

या पार्कच्या निर्मितीमध्ये बागनिर्मितीच्या इतर परंपरागत हेतुंसोबतच मुलांमध्ये (आणि मोठ्यांमध्येसुद्धा) वाहतुकीच्या नियमांसंबंधी जागरुकता निर्माण करणं हाही एक हेतु आहे हे त्याच्या नावावरून कळूनच येतं. पुढे ते पदोपदी स्पष्ट होत जातं. हा विषय आजच्या संदर्भात अगदी योग्य आणि अतिशय महत्वाचा आहे यात शंकाच नाही आणि तो हाताळण्यासाठी बगिच्याचे माध्यम वापरून नागपूर महानगर पालिकेने आपली कल्पकता दाखवून ज्ञान आणि मनोरंजनाचा सुरेख असा संतुलित समन्वय साधला आहे.

ट्रॅफिक पार्कमध्ये प्रवेश करताच डाव्या हातच्या भिंतीवर वाहतुकसंबंधित चिन्हे रंगवलेली दिसतात.

पार्कमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरपट्ट्या, झोपाळे ई. सोबतच त्यांना आकर्षित करेल अशी हे एक खोलीही आहे.

हो, एक सांगायचंच रहिलं. हा पार्क वॉकर्स, जॉगर्स आणि व्यायामेच्छु लोकांचीही सोय करतो. मी गेलो तेव्हा (सकाळी सुमारे आठ – सव्वा आठ) बरेच लोक धावत, चालत किंवा व्यायाम करीत होते. फोटोंमध्येही ते अधून मधून डोकावतात. (डोकाऊन राहिले आहेत!)

परंतु पार्कमध्ये प्रवेश केल्याबरोबर सर्वप्रथम जर काही नजरेस पडत असेल तर ते म्हणजे सरळ समोर, पार्कच्या दुसऱ्या टोकाला असलेले खांब. समान उंची आणि जाडीचे, विविध रंगात रंगवलेले, संख्येनी जवळपास साठ असलेले हे खांब वक्राकार रेषेत असून उचित उंचीच्या ओट्यावर एकमेकांच्या जवळ जवळ उभारलेले आहेत. उजवीकडे फिकट निळ्या रंगापासून सुरु होत क्रमाक्रमाने गडद होत डावीकडे गर्द लाल अशी मनोहर रंगसंगती पहायला मिळते.

त्या खांबांचा सुरेखपणा पाहून अतिशय आनंद झाला. जास्त आनंद अनपेक्षितपणाचा झाला. त्या खांबांचं ते दृश्य इतक्या अनपेक्षितपणे समोर आलं होतं.

काही वेळ त्या खांबांकडे नुसताच पहात राहीलो. त्यांच्या रंगसंगतीची मजा चाखत राहिलो.

नंतर मेंदु परत कार्यरत झाला. प्रश्न विचारू लागला.
हे खांब इथे कशाला रोवले आहेत? त्यांचा उद्देश काय?
ही कल्पना ज्यानी कोणी हा पार्क डिझाईन केला असेल त्याला कशी सुचली असेल?
ही कल्पना ओरिजिनल आहे की कॉपी-पेस्ट?
ही कल्पना त्यानी डिझाईन पास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मलिकेच्या गळी कशी उतरवली असेल?
. . . .
जवळ जाऊन निरिक्षण – परिक्षण करणं आवश्यक होतं.
ते खांब सिमेन्ट कॉंक्रीटचे आहेत. त्यांच्यावरील आडव्या नळ्या लोखंडी असाव्यात. (कुठे कुठे गंज दिसून आला).
माझ्यातला छायाचित्रकार जागा झाला. मी त्या कामी लागलो.

रिपोर्ट आपल्यासमोर सादर आहे.

मी त्या पार्कमध्ये गेलो त्या दिवशी वातावरण ढगाळ होतं. सूर्याचा कुठेच पत्ता नव्हता. त्या खांबांची छायाचित्रे काढत असतांनाच मनात विचार आला, या खांबांच्या सावल्यांचे फोटो मस्त येतील. आणि मध्येच आलेल्या उन्हाच्या तिरीपेनी या विचारावर शिक्कामोर्तब केलं.

म्हणजे पुन्हा येणं आलं.

मग वाट पहिली. आणि एक दिवस सकाळपासूनच सूर्यदेव फॉर्मात आले.

 

हे खांब दिवसाच्या कुठल्याही वेळेस (साधारणपणे) सारखेच दिसतील.

सावल्यांचं तसं नाही.

सूर्याच्या चढ उताराप्रमाणे त्या लहान मोठ्या होत जातील. दर तासातासाला बदलतील. ऋतुबदलानुसार सूर्यदेव जसे डावीउजवीकडे सरकतील तश्या त्या उजवीडावीकडे सरकतील. श्रावणाच्या कोवळ्य़ा उन्हात कडांना किंचित अस्पष्ट असतील. हिवाळ्य़ाच्या सकाळी आणखीनच वेगळ्या भासतील. आणि उन्हाळ्यात जेव्हा तो सहस्त्ररश्मी आपल्या संपूर्ण शक्तीनिशी अनिर्बंध प्रकाश त्या खांबांवर टाकत असेल त्यावेळेस एकदम स्पष्ट, शार्प राहतील.

आणि दरवेळेस त्या पायऱ्यांवर वेगवेगळी नक्षी काढतील.

शक्यता अनंत आहेत. त्या सर्व चित्रित करणं (मला तरी) अशक्य आहे.

पण एक मात्र नक्की.
एप्रील किंवा मे मध्ये साधारणपणे दहा साडेदहा वाजता पुन्हा एकदा तरी जायचं आहे.

येणार का?

आपल्या ओळखीच्या इतर लोकांना, खास करून अनिवासी नागपूरकरांना लिंक फॉर्वर्ड करा.
पुन्हा भेटूच.
रCक.

 

3 Comments

  1. Swanand bhole
    ·

    Fantastic observations…keep the good hobby going

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *