संजय यादव

संजय यादव एक व्हिडिओग्राफर आहे. मन लाऊन व्हिडिओग्राफी करतो. आपल्या व्हिडिओग्राफीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी सतत धडपडत असतो. काहीतरी नवीन करत असतो.

तो आणि मी आम्ही दोघेही कवी कुसुमाग्रज वाचनालयाशी निगडित आहोत. वाचनालयाच्या विविध कार्यक्रमात तो व्हिडिओ चित्रिकरण करत असतो आणी मी स्थिर. आमची ओळखही तिथलीच. समान शीले व्यसनेषु सख्यम् या न्यायाप्रमाणे वयातील अंतराला छेद देऊन आमच्या परिचयाचं स्नेहात रुपांतर झालं. एकमेकांच्या चित्रीकरणावर साधक बाधक (हो, बाधकसुद्धा) चर्चा करणं आम्हा दोघांनही आवडतं कारण त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळतं, काहीरी नवीन शिकायला मिळतं.

संजयला कलेची आवड आहे. आपल्या कलेच्या अभिव्यक्तिसाठी त्याने व्हिडिओचित्रीकरण या माध्यमाची निवड केली आहे. फक्त प्रश्न आहे तो सवडीचा. पूर्णवेळाची नोकरी करून या छंदाला जेव्हढी सवड देता येईल तेव्हढी तो देत असतो. अर्थात त्यामुळे आमच्या भेटींवर आणि चर्चांवर वेळेच्या मर्यादा पडतात.

चालायचंच!

संजय साधा सरळ माणूस आहे. छक्के-पंजे नसलेला. अशी माणसं आजकाल फर दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळे त्यांना जपून ठेवावसं वाटतं. तो जसा साधा आहे तसाच एक तळमळ असलेला माणूस आहे. या वाचनालयात लोकं आपल्या फायद्यासाठी काम करत नाहीत तर घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतात हे त्याला कळलं आणि तो आपलं पोळपाट-लाटणं आणि पीठाची पिशवी घेऊन आला. बाकी पोत्यापोत्यांनी पीठ आणून वाचनालयाच्या भाकऱ्या भाजणाऱ्यांबद्दल त्याला प्रचंड आदर आणि आत्यंतिक आत्मीयता आहे. वाचनालयाची जास्तीत जास्त प्रगती व्हावी, वाचनालयाची स्वतःची वास्तु असावी, सभासदासंख्या आणि गंगाजळी वाढावी यासाठी तो विचार करीत असतो आणि वाचनालयाचे सचीव श्री पाठक यांच्यासोबत यासाठी काय करता येईल याची तळतळून चर्चा करत असतो. छान वाटतं.

मी कोणत्याही कार्यक्रमाला, समारंभाला किंवा सहलीला गेलो तर तिथे छायचित्रण करत असलेल्या इतर छायचित्रकारांची छायचित्रे हमखास काढतो. कारणे तीन: एक म्हणजे मला ते मनापासून आवडतं. दुसरं कारण असं की ते सर्वांचे फोटो काढत असतात, त्यांचे फोटो कुणीच काढत नाहीत. आयुष्यात ते कितीही पुढे असोत, कॅमेऱ्याच्या मात्र मागेच असतात. त्यांचेही फोटो कुणीतरी काढायला हवेत नं? तिसरं कारण असं की फोटो काढतानाची त्यांची तन्मयता मला फार मौल्यवान वाटते. पूर्ण लक्ष केंद्रित करून कुणीही काहीही करत असलं तर ते दृष्य मला मोहवून, गुंगवून टाकतं.

संजचेही मी निरनिराळ्या वेळी अनेक फोटो घेतले आहेत.

मध्यंतरी आमच्या कवि कुसुमाग्रज वाचनालयातर्फे आयोजित एका संगीताच्या कार्यक्रमात अ‍ॅज युजुवल आम्ही दोघेही आपापली पोळपाट – लाटणी – पीठ घेऊन डेरेदाखल होतो. सभागृहातील प्रकाश व्यवस्था मनाजोगतॊ होती. कार्यक्रमादरम्यान मी मोक्याची जागा अडवून होतो आणि संजय परिक्रमा करीत होता -एका अपघातात झालेली दुखापत नजरेआड करून – अजूनही त्याचा उजवा घोटा कुरकुर करतो. त्याच्या परिक्रमांमध्ये इतक सातत्य असतं की त्यानी ते ग्रह-ताऱ्यांकडून शिकलं आहे की ग्रहताऱ्यांनी याचा ट्युशन क्लास जॉईन केला होता कळत नाही. त्याच्यावर पडणारा प्रकाश फारच विलोभनीय होता. नाहीतरी मुख्य कार्यक्रमाचं फोटो आकर्षण संपलेच होतं. मग संजयवर पडाणाऱ्या प्रकाशाकडे लक्ष देऊ लागलो. त्यावेळी काढलेली ही काही छायचित्रे.

छायाचित्रे अर्थात संजयला न सांगता काढली आहेत. त्यामुळे त्याच्या पोझेस आणि चेहेऱ्यावरील भाव अगदी सहज आहेत. किती तन्मयतेने, किती भान हरवून तो व्हिडिओग्राफी करतो आहे पहा!

हा उजेड सावल्यांचा, प्रकाश अंधाराचा ममला असल्यामुळे येथे श्वेत-धवल चित्रे तर अनिवार्य आहेत नाही का?

4 Comments

 1. Ravindra Mahadik
  ·

  छान व प्रेरणादायी व्यक्तीमत्व

  Reply
   1. Sudhir Mutalik
    ·

    फोटो अतिशय उत्तम. प्रकाश योजना सुंदर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *